Blog

मुलाखतीची भीती हवी कशाला?

स्पर्धात्मक परीक्षेत मराठी तरुणांना यश मिळावे, यासाठी माजी सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या पुढाकाराने ‘आरोही’ हा उपक्रम सुरु झाला आहे. स्पर्धात्मक परीक्षेतील पुढचा टप्पा असतो मुलाखतीचा. तिला सामोरे जाताना नेमके काय करायला हवे, हे सांगणारा हा लेख…

लेखी परीक्षा पास झालेली असते. प्राथमिक परीक्षेतल्या यशाने लेखी परीक्षेत उत्साह वाटतो. लेखी परीक्षा पास झाल्यावर मुलाखतीचे वेध लागतात. ती तारीख पडली कि कोर्टातल्या तारखेप्रमाणे आपल्याला नर्व्हस व्हायला लागते.

परीक्षेची भीती आणि मुलाखतीची भीती यात अंतर असते. परीक्षेत फक्त पेपर लिहायचा असतो. समोर आठ-दहा माणसे बसून प्रश्नांची सरबत्ती करत नसतात. त्यामुळे, मुलाखतीचा ताण वेगळा असतो. खरंच, आपल्याला नेमकी कशाची भीती वाटते? नापास होण्याची? लोक काय म्हणतील याची? आईबाबांना वाईट वाटेल याची? सहपाठी पुढे जातील याची? की काही जमत नाही याची?

मुलाखतीत इंग्रजी बोलावे लागणार असले तर प्रचंड दडपण येते. इंग्रजी लिहायला त्रास नसतो. उलट मराठी माध्यमांच्या शाळांमधून इंग्रजी व्याकरण पक्के करून घेतलेले असते. पण बोलायचा सराव नसतो ना! घरी-दरी, मित्रांशी आपण सोयीच्या भाषेत बोलतो. घरी मातृभाषेत म्हणजे आई बोलते त्या भाषेत आपण बोलतो.

मग इंग्रजीत इंटरव्ह्यू द्यायचा म्हटले की कापरे भरते. आयत्यावेळी मराठी शब्द तोंडात येतात. हिंदी बोलताना नाही का, आपण मराठी शब्द घुसवून बोलतो आणि ते ऐकणाऱ्याला समजेल असे समजतो. इथे प्रश्न समोरच्याला समजविण्याचा नसतो. आपल्या इभ्रतीचा असतो. ते आपल्यात ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत का, म्हणजे अधिकारी व्हायला योग्य गुण आहेत का, याची चाचपणी करत असतात. त्यामुळे सुरुवात चुकीच्या किंवा अशुद्ध भाषेत झाली तर पहिले इम्प्रेशन खराब होते. याच्या नुसत्या जाणिवेने मन काळवंडते. आपला न्यूनगंड इतका वाढतो की रणांगण सोडून पळून जावेसे वाटते. नेमके अशावेळीच आपले व्याकरण दगा देऊ लागते.

हल्ली मातृभाषेत इंटरव्ह्यू द्यायची सोय आहे. मला असे समजले की, त्या ठिकाणी दुभाषा असला तरी अनेकदा तो आपले बोलणे बरोबर समजावून सांगत नाही. एकाने तर सांगितले कि त्याच्या मुलाखतीचा दुभाषा वेळेवर पोहोचलाच नाही. सगळा वेळ त्याला इंग्रजीतून बोलावे लागले. अशावेळी हिंदीतही बोलता येते. मात्र, हिंदी उत्तर भारतीयांसारखे हवे. आपण आदराने तुम्ही म्हणतो, हिंदीत आदराने आप म्हणतात. तुम म्हणालो तर अपमान होतो. त्यामुळे हिंदी बोलताना जबाबदारीने बोलावे लागते.

मौखिक परीक्षेत योग्य गुण न मिळाल्यास आपण स्पर्धात्मक परीक्षा पार करू शकत नाही. अनेकजण लेखी परीक्षा व्यवस्थित लिहितात. त्यात पासही होतात. परंतु मौखिक परीक्षेत योग्य ते गुण मिळवू शकत नाही. पर्यायाने अपयशाचा शिक्का माथी घेऊन, निराश होऊन ते दुसरा मार्ग शोधतात. स्पर्धात्मक परीक्षा पास होण्यात आपली वैयक्तिक गरज काय आहे, याचा आढावा घ्यायला हवा. प्रशासकीय सेवेचे अप्रूप वाटते म्हणून आपण ही परीक्षा देतो आहोत का याचा विचार सर्वप्रथम करायला हवा.

एकदा उद्दिष्ट स्पष्ट झाले की मनातली अनामिक भीती कमी होते. आपली महत्वकांक्षा म्हणुन आपण स्पर्धांमध्ये उतरत असलो तरी तयारी मजबूत केली आहेना, याचा विचार प्रत्येकाने करावा. खरेतर मौखिक परीक्षा आपले ज्ञान किती आहे हे विचारात घेण्यासाठी नसते. आपले ज्ञान लेखी परीक्षेत दाखवून आपण पुढे आलेलो असतो. इंटरव्ह्यूमध्ये तुमची समयसूचकता आणि मुख्यत्वे तुमचे व्यक्तिमत्व जोखले जाते. त्यामुळे याला व्यक्तिमत्व परीक्षा म्हणायला हरकत नाही. एकदा लक्षात घेतले की आपल्याला त्याला सामोरे जायला कठीण नाही.

अनेक लोक यशाबद्दल सकारात्मक विचार करायचा सल्ला देतात. आपण प्रत्यक्ष मुलाखतीत कसे वागणार, कसे बोलणार आहोत याचे मानसिक चित्र नेत्रपटलावर कोरायला आणि ते रोज बघायचा अभ्यास करायला शिकविले जाते. हे योग्यच आहे. परंतु मी एक वेगळा विचार मांडते आहे. आपण जर या परीक्षेत उत्तीर्ण झालो नाही तर काय होईल, याचा सखोल विचार करणे गरजेचे आहे. आपल्याजवळ दुसरे कुठले पर्याय आहेत, याचा मागोवा घ्यायला हवा. आपले अंतिम ध्येय काय आहे हे आपल्या मनात स्पष्ट असायला हवे.

मी कधीच प्रशासकीय सेवेचे स्वप्न पहिले नव्हते. केवल अपघाताने मी या सेवेत आले. मला खरेतर दुसऱ्या व्यवसायात जायचे होते. सुरुवातीला कितीतरी वर्षे असे वाटायचे की मला प्रशासकीय सेवेत रस नाही. परंतु एकदा एक स्वीकारले की त्यात जीव ओतून काम करायला हवे. काम करता करता ते आवडू लागले. नवीन कल्पना सुचू लागल्या. मग हाच माझा व्यवसाय झाला. मला माझ्या कामात आनंद मिळू लागला.

तात्पर्य एवढेच आहे की आपल्याजवळ पर्याय तयार ठेवायचे. यासाठी नाही की आपण ही परीक्षा पार करू शकणार नाही. हे यासाठी करायचे की त्यामुळे आपल्या मनावरचे दडपण कमी होते. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना आमच्या प्रशासकीय ऑक्याडमीत आल्या होत्या. त्या म्हणाल्या “मी राजकारणात आले नसते तर माझ्याजवळ इतर अनेक पर्याय होते.” अशा दृष्टीने आपले काम सोपे होते. एकाच ध्येयावर अडून आपण स्वतःचे नुकसान करतो. आपल्याजवळ सदैव पर्याय तयार हवेत.

मौखिक परीक्षेसाठी खरोखर काय लागते? उत्तम व्यक्तिमत्व, इंग्रजीवर प्रभुत्व, उच्चपदस्थांची ओळख-भेट, उंची आणि रुबाबदार कपडे, समयसूचकता, थोर-मोठ्यांशी लागेबांधे, आत्मविश्वास की लाचखोरी? मी असे सांगेन की सामान्यज्ञान, समयसूचकता, आत्मविश्वास, सकारात्मक देहबोली आणि प्रामाणिकपणा हे गुण आपल्याला तारून नेतात. वेष साधा असला तरी चालतो. तो स्वच्छ व नेटका असावा. वागण्या-बोलण्यात अहंमन्यता नसावी. एवढे असले तरी पुरे. मग मुळाखतीचे तंत्र तुम्हाला आत्मसात झाले असे म्हणायला हरकत नाही.

नीला सत्यनारायण, अनुराधा प्रभुदेसाई

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes:

<a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

18 + seventeen =