माझे वडील पोलीससेवेत कार्यरत असल्याने शासकीय काम व शासकीय अधिकार याबाबत घरी सतत चर्चा होत असे. मी प्रशासकीय सेवेत उच्च अधिकारी व्हावे, ही माझ्या वडिलांची इच्छा होती. त्यांच्याकडूनच मला खरी प्रेरणा मिळाली. त्यामुळे अधिकारी होण्यासाठी काय करावे लागते, याची सविस्तर माहिती मी सतत मिळवत राहिलो. हे ध्येय मी पक्के ठरवले होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील रेठरे वारणा हे माझं मूळ गाव. पण वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने बालपण मुंबईला गेल्याने सर्व शिक्षण मुंबईतच झालं. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी व अभ्यासासाठी पुण्यात चांगलं पोषक वातावरण आहे असं कळल्यामुळे मी पुण्यात आलो आणि परीक्षेची तयारी करण्यास सुरवात केली. पण आर्थिक अडचणीमुळे मी पुण्यात कायम स्वरुपी राहू शकलो नाही.
पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना मंत्रालय सहायक व विक्रीकर निरीक्षक या पदासाठी परीक्षा दिली. पण 10 गुणांनी माझी निवड हुकली. मात्र अजून सखोल अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच यश मिळू शकते, याची खात्री पटली, आत्मविश्वास वाढला. नंतर सतत प्रयत्न करत राहिलो. 2009 ते 2013 ही चार वर्षे अथक प्रयत्न करुन अखेर मी परीक्षा उत्तीर्ण झालो. विक्रीकर सहायक म्हणून माझी निवड झाली. ‘सुगम मराठी व्याकरण व लेखन’ या पुस्तकाने माझा व्याकरणाचा पाया पक्का होण्यास मोलाची मदत झाली.
या प्रवासात माझ्या करियरबाबत अनेकदा वडिलांना टोमणे खावे लागले. “झाला का तुमचा मुलगा क्लास वन ऑफिसर?” असे खवचट उद्गार ऐकावे लागले. मला व माझ्या वडिलांना या गोष्टी मनाला फार लागल्या. पण एका वर्षातच मी क्लास वन ऑफिसर झालो व वडिलांना आनंदित केले. संघर्ष आणि आर्थिक परिस्थितीशी सामना करताना मला मित्रांची मोलाची मदत झाली.
स्पर्धापरीक्षा देऊ इच्छिणार्या मित्रमैत्रिणींना माझी विनंती आहे की अभ्यास करताना आपली तब्येतही सांभाळा. आपल्या प्रकृतीनुसार रात्री जागरण करून अभ्यास करण्यापेक्षा पहाटे लवकर उठून अभ्यास जास्त होतो का ते ठरवा.
घरापासून लांब राहिलात तरी आपले ध्येय विसरू नका. ज्या क्षेत्राची आवड आहे, त्याचाच अभ्यास करा. वाढत चाललेल्या स्पर्धेचे भान ठेवा. योग्य मार्गदर्शक निवडा, पाया पक्का करा. परीक्षेची तयारी करताना करियरचा दुसरा पर्यायही तयार ठेवा. मग यश तुमच्यापासून दूर राहणार नाही.
—
किरण जाधव | विक्रीकर सहायक (2015)