Blog

स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण – शब्दविचार 2

स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण – भाग ४

वैशाली कार्लेकर

मुख्य संपादक, मो रा वाळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन

 

मागील लेखात आपण व्याकरणातला शब्दविचार शिकताना ‘शब्दांच्या पलीकडले’ ही ओळ आठवावी असे म्हटले होते. कारण प्रत्येक स्वतंत्र ‘शब्दाच्या पलीकडे’ जाऊन त्या शब्दाद्वारे वाक्यात कोणते कार्य घडले आहे, त्या संदर्भावर त्या शब्दाची जात (प्रकार) अवलंबून असते. आजच्या लेखात आपण थोडेसे शब्दांच्या पलीकडे जात काहीसे शब्दांमध्येही डोकावणार आहोत. दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून घडणारा समास, शब्द कुठून आले, कसे तयार झाले हे सांगणारी शब्दसिद्धी आणि शब्दांचे पर्यायाने संबंधित वाक्यांचे अनेकार्थ सूचित करणारी शब्दशक्ती याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत.

समास

समासाचा उपयोग करून तयार झालेले आमरण, यथाशक्ती, नवरात्र, साखरभात, खरेखोटे, चहापाणी असे अनेक सामासिक शब्द आपण दैनंदिन भाषेत अगदी मोठ्या प्रमाणात वापरतो. आमरण म्हणजे मरणापर्यंत, नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह तर साखरभात म्हणजे साखर घालून तयार केलेला भात. अशाप्रकारे मधले काही शब्द गाळून आपण मुख्य शब्दांचे जे एकत्रीकरण करतो त्याला समास म्हणतात. यातून जो जोडशब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. तर सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दांत केलेले स्पष्टीकरण याला समासाचा विग्रह म्हणतात.

समासात कमीत कमी दोन शब्द किंवा पदे एकत्र येतात. या दोन शब्दांपैकी कोणत्या पदाला अधिक महत्त्व किंवा कोणत्या पदाबद्दल आपल्याला अधिक बोलावयाचे असते यावरून समासाचे प्रकार ठरविण्यात आले आहेत.  म्हणजेच दरवेळी सामासिक शब्दाचे फक्त रूप पाहून समास सांगणे काहीसे अवघड होऊ शकते. यासंदर्भात एक सुंदर संस्कृत वचन पाहू –

अहं च त्वं च राजेंद्र लोकनाथावुभावपि

बहुव्रीहिरहं किन्तु षष्ठीतत्पुरुषो भवान

या श्लोकात एक व्याकरणाचा अभ्यास करणारा विद्वान राजाला म्हणतो की “हे राजा, तू आणि मी दोघेही लोकनाथ आहोत. फक्त मी बहुव्रीही (व्याकरणाचा/भाषेचा अभ्यास करण्यासाठी लोक ज्याचे नाथ आहेत असा) तर तू षष्ठी तत्पुरुष (लोकांचा नाथ) आहेस.”

 • थोडक्यात सामासिक शब्दांचा वाक्याच्या संदर्भात कोणता अर्थ अपेक्षित आहे, त्यावर त्यांचा समास ठरवणे जास्त योग्य ठरेल.
 • अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही असे समासाचे चार मुख्य प्रकार आहेत.
 • परीक्षेसाठी समास विषयाचा अभ्यास करताना प्रत्येक समासाच्या लक्षणांचा व उदाहरणशब्दांचा अभ्यास करावा.
 • समासाचा योग्य विग्रह करता आला आणि कोणते पद महत्त्वाचे आहे हे लक्षात आले की समास ओळखता येतो.
 • सामासिक शब्दांच्या निरीक्षणातून निघालेल्या अनुमानानुसार – द्वंद्व व तत्पुरुष समास असलेले शब्द नामे किंवा विशेषणे असतात. अव्ययीभाव समास असलेला शब्द क्रियाविशेषण असतो आणि बहुव्रीही समास असलेला शब्द विशेषण असतो.

शब्दसिद्धी

शब्दसिद्धी म्हणजे शब्द कसा सिद्ध झाला किंवा तयार झाला हे अभ्यासणे. भाषेच्या अभ्यासकांनी केलेल्या मांडणीनुसार शब्दांचे त्यांच्या मुळानुसार तत्सम, तदभव, देशी आणि परभाषीय अशा प्रकारांमध्ये वर्गीकरण होते. तर शब्द कसे घडले यावरून उपसर्गघटित व प्रत्ययघटित असे प्रकार पडतात.

 • अनेक संस्कृत शब्द मराठीत जसेच्या तसे (तत्सम) किंवा काही बदल होऊन (तदभव) रूढ झाले. अग्नि, कर्ण, चक्र, पर्ण अशा मूळ संस्कृत शब्दांपासून मराठीत आग, कान, चाक, पान असे शब्द तयार झालेच पण अनेक शब्दांची दोन्ही रुपेही प्रचारात राहिली.
 • झाड, डोंगर, डोळा, डोके असे अनेक शब्द इथल्या मूळ रहिवासी बोलीमधून आले असावेत, त्यांना देशी शब्द म्हणतात.
 • भारतातील इतर भाषांमधून आलेले आणि विदेशी भाषांमधून मराठीत आलेले शब्द परभाषीय म्हणून ओळखले जातात. टेबल, बस, बटाटा, हापूस, पेशवा, गुलाब असे अनेक मूळचे परभाषीय शब्द आज आपण मराठीत सहजगत्या वापरतो.
 • अभि, अनु, आड, कम असे संस्कृत, मराठी, फारसी, अरबी उपसर्ग लागून तयार झालेले अभिनंदन, अनुकरण, आडनाव, कमकुवत असे अनेक उपसर्गघटित शब्द आपण वापरतो.
 • अनीय, रा, गिरी, दार असे संस्कृत, मराठी, फारसी प्रत्यय लागून तयार झालेले श्रवणीय, हसरा, गुलामगिरी, दुकानदार असे दैनंदिन भाषेतील शब्द हे प्रत्ययघटित आहेत.
 • परीक्षेच्या दृष्टीने तत्सम, तदभव, देशी आणि परभाषीय हे शब्द जसेच्या तसे लक्षात ठेवावे लागतात, तर उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्दांचे प्रत्यय आणि उपसर्ग लक्षात ठेवले तरी त्यावरून शब्दप्रकार ओळखणे सोपे जाते.

 

शब्दशक्ती

शब्दशक्ती हा साहित्याच्या दृष्टीने खरंतर सखोल अभ्यासाचा विषय आहे. पण मर्यादेमुळे इथे आपण अभिधा, व्यंजना आणि लक्षणा या शब्दशक्तीच्या तीन प्रमुख प्रकारांचा थोडक्यात परिचय करून घेऊ या.

 • अभिधा म्हणजे शब्दशः, कोशगत किंवा रूढ अर्थ व्यक्त करणारी शब्दाची शक्ती. उदा. ‘मी झाड पाहिले ’ या वाक्यातील ‘झाड ’ हा शब्द उच्चारल्याबरोबर झाडाचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते व अर्थ सरळपणे स्पष्ट होतो.
 • व्यंजना म्हणजे मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची शक्ती. उदा. ‘समाजात वावरणाऱ्या अशा धूर्त कोल्ह्यांपासून सावध राहायला हवे.’ इथे धूर्त व्यक्तींपासून सावध राहायला हवे असा दुसरा अर्थ प्रभावीपणे सूचित होतो. असा सूचित एक किंवा अनेक अर्थ प्रगट करण्याची शब्दांची शक्ती म्हणजे व्यंजना. काव्यात्म लेखनासाठी व्यंजना शक्तीचा वापर श्रेष्ठ व परिणामकारक ठरतो.
 • लक्षणा म्हणजे मूळ अर्थाला बाधा आणून जुळणारा दुसरा अर्थ घेणे. उदा. ‘घरावरून हत्ती गेला ’ इथे घरावरून याचा शब्दशः अर्थ घेतला तर अनर्थ होईल, त्याऐवजी ‘घरासमोरून हत्ती गेला’ असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो.

अशाप्रकारे शब्दविचाराचा डोळस अभ्यास व्याकरणाबरोबरच भाषाभ्यासाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. पुढील लेखात आपण वाक्यविचार पाहू.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes:

<a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

five × 1 =