Blog

स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरणाचा अभ्यास

स्पर्धापरीक्षांसाठी मराठी व्याकरणाचा अभ्यास

वैशाली कार्लेकर

मुख्य संपादक, मो रा वाळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन

महत्त्वाचे मुद्दे

•आधी घटकांचे टिपण काढा, मग सरावप्रश्न सोडवा

संकल्पना समजून घ्या, मग गुण मिळतीलच

व्याकरणाचे ज्ञान आणि वेगाने प्रश्न सोडविण्याचा सराव महत्त्वाचा

•            

• उत्तम प्रशासनाचा मूलाधार आहे – अचूक माहिती, वेगवान कार्यवाही आणि संवादकौशल्य. या सर्वांसाठी आवश्यक आहे उत्तम भाषाज्ञान. म्हणूनच प्रशासकीय अधिकार्‍यांच्या निवडीसाठी घेतल्या जाणार्‍या परीक्षांमध्ये भाषाज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे. या लेखमालिकेमध्ये आपण एम पी एस सीच्या आगामी स्पर्धापरीक्षा डोळ्यासमोर ठेवून मराठी विषयाच्या व्याकरणविषयक घटकांबाबत महत्त्वाच्या मुद्द्यांची चर्चा करणार आहोत. या माहितीचा तुम्हाला मराठी व्याकरण विषयावर आधारित सर्व स्पर्धापरीक्षांसाठी निश्‍चितच उपयोग होईल.

काठिण्यपातळी वाढली

2012 नंतर परीक्षांच्या स्वरूपामध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बदलानंतर वर्ग १ व २ साठी असलेल्या परीक्षेची काठिण्यपातळी वाढलेली आहे. याचमुळे मराठी व्याकरणातील संकल्पना समजून न घेता केवळ पाठांतर केलेल्या उमेदवारांची उत्तरे शोधताना गफलत होते आणि व्याकरणासारख्या हक्काच्या विषयात गुण जातात. म्हणूनच मुळातून व्याकरण समजून घ्या, गुण मिळतीलच. कारण वाढलेल्या काठिण्यपातळीनुसार व्याकरणाच्या संकल्पना, नियम किंवा व्याख्या यासंदर्भात विधाने यावर गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे केवळ पाठांतर इथे मदतीला येत नाही तर अर्थ समजून लक्षात ठेवलेले नियमच आपल्या मदतीला धावत येतात.

कमी वेळात जास्त प्रश्न सोडविण्याचा सराव

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लक्षात घेण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रश्नातील किंवा पर्यांयामधील मोठा मजकूर. 50 प्रश्नांसाठी 30 मिनिटे हा वेळ पाहता प्रत्येक प्रश्न वाचून समजून घेण्यासाठी साधारण अर्ध्या मिनिटापेक्षा थोडा जास्त वेळ मिळतो. लांबलचक विधाने वाचणे, त्यातील रोख लक्षात घेणे व एक किंवा अनेक अचूक पर्याय निवडणे यात उमेदवारांच्या व्याकरणविषयक ज्ञानाची खरोखरच परीक्षा घेतली जाते. अशा प्रकारच्या प्रश्नांचे स्वरूप 80% पेक्षा जास्त असल्याने व्याकरणाचे ज्ञान आणि कमी वेळात प्रश्न सोडविण्याचा सराव इथे महत्त्वाचा ठरतो.

आता आपण मराठी व्याकरण या विषयाच्या वस्तुनिष्ठ परीक्षेच्या अभ्यासक्रमाची माहिती घेऊया.

 

अभ्यासक्रम – मराठी व्याकरण व शब्दसंग्रह (वस्तुनिष्ठ/बहुपर्यायी)

एम पी एस सीच्या बहुतांश मुख्य परीक्षेतील या विषयाचा एक पेपर वस्तुनिष्ठ/बहुपर्यायी असतो. आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षेतील पेपर क्र. 2 हा मराठी व इंग्रजी(वस्तुनिष्ठ/बहुपर्यायी) आहे. त्यात मराठी विषयामध्ये 50 गुणांसाठी 50 प्रश्न विचारले जातात. त्यासाठी व्याकरणाचे सर्व घटक, म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी/विरूद्धार्थी शब्द, शुद्धलेखन, विरामचिन्हे असा पदवी पातळीपर्यंतचा अभ्यासक्रम आयोगाने जाहीर केलेला आहे. या व्यतिरिक्त इतर परीक्षांसाठीही गुणसंख्या व विभागणी बदलली तरी हाच अभ्यासक्रम आहे.

मराठी व्याकरणाचे वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार असे 3 घटक पडतात. स्पर्धापरीक्षेसाठी मराठी विषयाच्या वस्तुनिष्ठ प्रश्‍नपत्रिकेसाठी व्याकरणाचा अभ्यास करताना व्याकरणाचे हे 3 घटक व इतर 2 असे एकूण 5 मुख्य घटक आहेत.

सुरूवातीला आपण हे घटक व त्यासाठी असलेली अंदाजे गुणविभागणी पाहू. अर्थात ही गुणविभागणी मागील परीक्षांवर आधारित आहे. आगामी परीक्षांसाठी आयोग यामध्ये बदल करू शकतो.

वर्णविचार :     5-6

शब्दविचार :    18-20

वाक्यविचार :    10-11

शब्दसंग्रह :     12-15

गद्य आकलन :  5

यावरून आपल्या लक्षात आले असेल की शब्दविचार व शब्दसंग्रह हे मोठी व्याप्ती असलेले घटक परीक्षेच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाचे आहेत.

या परीक्षेसाठी आपल्या हातात अजून पुरेसा वेळ आहे. आत्तापासूनच पद्धतशीर अभ्यास केला तर या विषयात उत्तम गुण मिळवणे अवघड नाही. म्हणूनच आपणा सर्वांना या अभ्यासाला पूरक ठरणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या यावर या लेखमालिकेमध्ये आपण भर देणार आहोत. त्याचबरोबर महत्त्वाच्या घटकांचा आढावा आणि त्यावर विचारले गेलेले अवघड प्रश्न याबाबतही थोडक्यात चर्चा करणार आहोत.

Leave a Comment