Blog

स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण – वाक्यविचार

स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण – वाक्यविचार भाग ५

वैशाली कार्लेकर

मुख्य संपादक, मो रा वाळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन

वाक्य म्हणजे पूर्ण विधान करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह हे आपल्याला माहीत आहेच. आपल्या आजच्या वाक्यविचार या घटकासंदर्भात ज्येष्ठ कोशकार वि. वा. भिडे यांचा एक विचार इथे सारांशाने उदधृत करावासा वाटतो. ते लिहितात, ‘ भाषेतील मूळ शब्दांची रूपे तयार करणे, रूपे तयार झाल्यावर ती वाक्यात मांडणे आणि मनात आलेला विचार मांडण्याची धाटणी या तीन बाबींसंदर्भात भाषेचा जो विशेष असतो तो त्या भाषेचा स्वभाव असतो. व्याकरणाच्या अभ्यासाने भाषेचा बाह्य स्वभाव कळतो तर नवीन शब्द तयार करण्याची आणि ते सामावून घेण्याची धाटणी यातून तिचा गूढ स्वभाव समजून घेता येतो.’ यानुसार व्याकरणाच्या अभ्यासातून आणि श्रवण, संभाषण, भाषण, वाचन, आणि लेखन या भाषाविषयक कौशल्यांच्या अंगिकारातून भाषेच्या दोन्ही स्वभावांची बऱ्याच अंशी उकल होते असे मला वाटते.

आजच्या वाक्यविचारामध्ये आपण मुख्यतः विभक्ती, प्रयोग, वाक्यांचे प्रकार, वाक्य पृथक्करण, वाक्यरुपांतर अशा विविध घटकांची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

विभक्ती – आठ विभक्ती आणि त्यांचे प्रत्यय, प्रत्ययांमुळे क्रियापदाशी येणारे संबंध यावरून ठरणारे कारकार्थ आणि इतर शब्दांशी येणाऱ्या संबंधांवरून ठरणारे उपपदार्थ ही संकल्पना समजून घ्यावी. प्रत्ययांचा तक्ता पाठच करायला हवा.

प्रयोग – वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्परसंबंधाला प्रयोग असे म्हणतात. प्रयोगाचे मुख्य प्रकार तीन – कर्तरी, कर्मणी आणि भावे. क्रियापदाच्या रूपावर कर्ता किंवा कर्म यांपैकी ज्याचा प्रभाव असतो त्याला धातुरुपेश (धातु + रूप + ईश) म्हणतात. या धातुरूपेशावर प्रयोगाचा प्रकार ठरतो.

प्रयोगासंबंधी महत्त्वाचे

* प्रयोगात प्रथमान्त पदाला महत्त्व असते. त्यामुळे ज्या पदाला प्रत्यय लागला आहे ते पद प्रयोग ठरविते.

* कर्ता प्रथमेत तर कर्तरी प्रयोग असतो. कर्ता प्रथमेत नसेल आणि कर्म प्रथमेत (किंवा अप्रत्ययी द्वितीयेत) असेल तर कर्मणी प्रयोग.

उदा. शेतकरी शेती करतो. (कर्तरी प्रयोग)

शेतकऱ्याने शेती केली (कर्मणी प्रयोग)

*कर्ता व कर्म यांपैकी एकही पद प्रथमेत नसेल तर तो फक्त भावे प्रयोग.

उदा. मुलाने मांजराला गोंजारले.

*तिन्ही प्रयोगात जेव्हा प्रथमपुरुषी (मी, आम्ही ) व द्वितीय पुरुषी (तू, तुम्ही) सर्वनामे कर्ता म्हणून येतात तेव्हा विभक्ती ओळखण्याची खूण म्हणजे या सर्वनामांच्या जागी तो, ती, ते, त्या अशा तृतीयपुरुषी सर्वनामांचा उपयोग करून पाहावा. जर त्या जागी त्याने, तिने, त्यांनी अशी रूपे आली तर तिथे तृतीया विभक्ती.

उदा. मी वाचन करते – ती वाचन करते – प्रथमा – कर्तरी

मी वाचन केले – (ती) तिने वाचन केले – तृतीया – कर्मणी

वाक्यांचे प्रकार – वाक्यांच्या अर्थानुरोधाने मुख्य तीन प्रकार – १. माझे वडील परगावी राहतात. (विधानार्थी) २. तू मुंबईला केव्हा जाणार? (प्रश्नार्थी) ३. बापरे ! केवढी ही गर्दी ! (उद्गारार्थी)

*वाक्यरुपांतराच्या दृष्टीने दोन प्रकार – १. पुढारी भाषणे देतात. (होकारार्थी किंवा करणरूपी) २. गावात स्वच्छता नव्हती. (नकारार्थी किंवा अकरणरूपी)

*क्रियापदाच्या रूपावरून चार प्रकार – १. मुले घरी गेली. (स्वार्थी) २. मुलांनो चांगला अभ्यास करा.  (आज्ञार्थी) ३. माझी परीक्षेत निवड व्हावी (विध्यर्थी) ४. पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. (संकेतार्थी)

*वाक्यशास्त्रानुसार तीन प्रकार – १. पाऊस सुरु झाल्यावर तळी वाहू लागली. (केवल) २. जेव्हा पाऊस सुरु झाला तेव्हा तळी वाहू लागली. (मिश्र) ३. पाऊस सुरु झाला आणि तळी वाहू लागली (संयुक्त)

वाक्यरुपांतर  – वाक्यरूपांतरात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाक्याचा अर्थ न बदलता प्रकार बदलणे.

उदा. अपमान केल्यावर कोणाला राग येत नाही ? (नकारार्थी, प्रश्नार्थी)

अपमान केल्यावर प्रत्येकाला राग येतोच ( होकारार्थी, विधानार्थी)

वाक्य पृथक्करण – वाक्यातील विविध शब्दांचा परस्परांशी कोणता संबंध आहे हे विशद करणे यालाच वाक्यपृथक्करण म्हणतात. वाक्यामध्ये बोलणारा ज्याच्याबद्दल बोलतो तो उद्देश्य (कर्ता) आणि उद्देश्याविषयी जे बोलतो ते विधेय (क्रियापद) अशी ढोबळ विभागणी करता येते. त्यानंतर या उद्देश्य आणि विधेयाबाबत अधिक माहिती सांगणारे वाक्यातील जे शब्द असतात त्यांचे उद्देश्यविस्तार, कर्म, कर्मविस्तार, विधानपूरक, विधेयविस्तार अशा अनेक गटांमध्ये वर्गीकरण होते.

एकूणच वाक्यविचार हा घटक वरवर पाहता काहीसा क्लिष्ट वाटला तरी समजून घेतल्यावर सोपा जातो. परीक्षेच्या दृष्टीने विविध प्रकारातील वाक्यांचा अभ्यास करून परस्पररुपांतर करण्याचा सराव करावा. यातून सर्व प्रकारांचे बारकावे लक्षात येतात.

पुढील लेखामध्ये आपण शब्दसंपत्तीमधील वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द यांच्याविषयी माहिती घेऊ.

vaishali.karlekar1@gmail.com

You have to be sure all your facts and data are write essay for me online mentioned in an organized fashion so the reader may easily understand the meaning of your data.

Leave a Comment