Blog

आव्हान स्वीकारले व यशाचा ध्यास घेतला – नीला सत्यनारायण

मित्रमैत्रिणींनो, शाळा व महाविद्यालयामध्ये अतिशय हुशार विद्यार्थिनी म्हणून माझं नाव होतं. साहजिकच माझ्या शिक्षकांच्या व माझ्या आईवडिलांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. माझ्या वडिलांना फार वाटायचं की मी आय ए एस अधिकारी व्हावं. सहज गंमत म्हणून त्यांनी मला परीक्षेला बसायला सांगितलं. त्यावेळी खूपजणांनी मला सांगितलं, की तू परीक्षेला बसली आहेस, पण यशाची कुठलीच अपेक्षा ठेवू नकोस. कारण त्यावेळी या परीक्षेत मराठी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण फारच कमी होतं. पण आश्चर्य म्हणजे मी पहिल्या संधीतच लेखी व तोंडी परीक्षेत उत्तीर्ण झाले. इतकंच नाही तर गुणवत्ता यादीमध्ये माझं नाव झळकलं. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हे आव्हान स्वीकारलं आणि त्यात यशस्वी झाले.

1971 साली या परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी खाजगी किंवा शासकीय स्तरावर कोणतंही विशेष मार्गदर्शन उपलब्ध नव्हतं. फक्त निबंधलेखनाच्या मार्गदर्शनासाठी पुणे विद्यापीठाने एका सेवानिवृत्त आय ए एस अधिकार्‍यांची नेमणूक केली होती. मी इंग्रजी विषय घेऊन पदवी व पदव्युत्तर परीक्षा पास झाले होते. त्याच्या जोडीला मी इतिहास हा विषय घेतला. वडिलांनी माझ्या अवांतर वाचनासाठी इंग्रजी वृत्तपत्रं, विज्ञानविषयक मासिकं सुरू केली. यामुळे माझ्या सामान्यज्ञानात मोलाची भर पडली.

मी कधी रात्रंदिवस सतत अभ्यास केला नाही. पण रोज नियमाने थोडा थोडा अभ्यास केला. त्यात कसूर केली नाही. उजळणी म्हणून केलेल्या अभ्यासाची मी रोज टिपणे काढून ठेवत असे. मी रात्री 8.30 वाजता झोपायचे व सकाळी 4 वाजता उठून अभ्यास करायचे. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावरसुद्धा ‘ही काही विद्यापीठाची परीक्षा नाही, अखिल भारतीय पातळीवर यश मिळवून दाखव तर खरी.’ असे उद्गार मला ऐकून घ्यावे लागले होते. हे शब्द माझ्या जिव्हारी लागले. ते आव्हान स्वीकारून यशस्वी होण्याचा मी ध्यास घेतला व अखेर तो खरा करून दाखवला.

यशस्वितेसाठी तुम्हाला शुभेच्छा ! 

 

नीला सत्यनारायण (निवृत्त सनदी अधिकारी व माजी राज्य निवडणूक आयुक्त)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes:

<a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

ten − 6 =